खरीप २०२६-२७ साठी फ्रुटसेल सोसायटीत ऑनलाइन नोंदणी; पीकपेरा उतारा, आधार, पासबुक व फार्मर आयडी आवश्यक…
प्रतिनिधी | अमळनेर : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये उत्पादित होणाऱ्या ज्वारी व मक्याची शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करण्यासाठी अमळनेर तालुका फ्रुटसेल सहकारी सोसायटी येथे ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील ज्वारी व मका उत्पादक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सोसायटीच्या कार्यालयात स्वतः उपस्थित राहून वेळेत नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाच्या निर्धारित हमीभावानुसार ज्वारीची खरेदी प्रति क्विंटल ₹४,०२३, तर मक्याची खरेदी प्रति क्विंटल ₹२,४१० या दराने करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घेता येणार आहे.
नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी २०२६ खरीप हंगामातील ज्वारी अथवा मका पिकाचा पीकपेरा असलेला उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक आणि फार्मर आयडी ही कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया संबंधित शेतकऱ्यांच्या स्वतःच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सोसायटीच्या कार्यालयात हजर राहावे, असे सोसायटीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
नोंदणी करताना पीकपेरा उतारा तसेच इतर कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, याची शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा न करता कागदपत्रांची पूर्तता करून वेळेत ऑनलाइन नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
“पात्र शेतकऱ्यांनी २०२६ खरीप ज्वारी व मका पिकपेरा उतारा तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे पूर्णपणे सोबत आणावीत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करता येईल,” असे अमळनेर तालुका फ्रुटसेल सहकारी सोसायटीचे चेअरमन भागवत पंडीत पाटील यांनी सांगितले.
![]()

