आवश्यक कागदपत्रांसह १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान महाडीबीटीवर अर्जाची संधी; पात्र लाभार्थ्यांना ९० टक्क्यांपर्यंत अनुदान…
प्रतिनिधी | जळगाव : राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पिक’ (सूक्ष्म सिंचन) सन २०२६-२७ अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष अर्ज नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. दि. १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के, तर बहुभूधारक शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान देय आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून अनुक्रमे २५ व ३० टक्के पूरक अनुदानाची तरतूद आहे. अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, तर अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेंतर्गत पूरक अनुदान मिळत असल्याने पात्र शेतकऱ्यांना मापदंडानुसार ९० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळू शकते.
सन २०२६-२७ साठी या दोन्ही प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर निधी उपलब्ध आहे. मात्र, महाडीबीटी पोर्टलवर या प्रवर्गातील अर्जांचे प्रमाण कमी असल्याने कृषि विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान गावागावात मेळावे घेऊन शेतकऱ्यांना योजनेची माहिती देण्यात येणार आहे.
अर्जासाठी शेतकऱ्यांकडे मालकीचा ७/१२ उतारा, ८-अ उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुक असणे आवश्यक आहे. फार्मर आयडी तयार केलेला असणे तसेच आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. शेतात सिंचनाची सुविधा असणे आवश्यक असून तिची नोंद ७/१२ उताऱ्यावर असावी. नोंद उपलब्ध नसल्यास विहीर किंवा शेततळे यासंदर्भात स्वयंघोषणापत्र सादर करता येईल. योजनेचा लाभ कमाल पाच हेक्टर क्षेत्रासाठी देण्यात येणार आहे.
लाभार्थी निवडीनंतर संबंधित शेतकऱ्यांना लघुसंदेशाद्वारे माहिती देण्यात येईल. पूर्वसंमती मिळाल्यानंतर नोंदणीकृत कंपनीच्या अधिकृत वितरकाकडून सूक्ष्म सिंचन संच खरेदी करावा लागेल. संचाची उभारणी झाल्यानंतर कृषि पर्यवेक्षकामार्फत तपासणी करण्यात येईल आणि पात्र अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाईल.
विशेष मोहिमेअंतर्गत मंडळ कृषि अधिकारी व उपकृषि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषि अधिकारी गावोगावी मेळावे घेऊन अर्ज प्रक्रिया व योजनेची माहिती देणार आहेत. अर्ज भरताना माहिती अचूक नोंदवावी, जेणेकरून त्रुटींमुळे अर्ज रद्द होणार नाही, असे कृषि विभागाने स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी सहाय्यक कृषि अधिकारी, उपकृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी किंवा CSC केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()

