नागरिक, पोलीस, होमगार्ड व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना आपत्कालीन प्रसंगी तातडीच्या उपचारांचे प्रात्यक्षिक…
प्रतिनिधी | अमळनेर : गणेशोत्सवातील गर्दीत एखादी व्यक्ती अचानक अत्यवस्थ झाल्यास रुग्णालयात पोहोचेपर्यंतची सुरुवातीची काही मिनिटे अत्यंत महत्त्वाची ठरू शकतात. याच पार्श्वभूमीवर नागरिक, पोलीस, होमगार्ड आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना CPRसह विविध प्राथमिक उपचारांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
अमळनेर शहर पोलीस ठाणे, लायन्स क्लब अमळनेर आणि जय बजरंग मंडळ, पानखिडकी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. १६) रात्री ‘वेळीच उपचार शिका, जीवन वाचवा!’ या उपक्रमांतर्गत जय बजरंग मंडळ येथे प्राथमिक उपचार व जनजागृती शिबिर घेण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या हस्ते गणरायाची आरती झाल्यानंतर प्रशिक्षणाला सुरुवात झाली.
आपत्कालीन वैद्यकीय सेवा तज्ज्ञ डॉ. विक्रांत पाटील आणि डॉ. मिलिंद नवसारीकर यांनी हृदयविकाराचा झटका, श्वास गुदमरणे, चक्कर किंवा भुरळ येणे अशा परिस्थितीत तातडीने कोणती कृती करावी, याचे मार्गदर्शन केले. हृदयविकाराच्या प्रसंगी CPR कसा द्यावा, तसेच रुग्णवाहिका, पोलीस आणि वैद्यकीय मदत तातडीने कशी मागवावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात आले.
गणेशोत्सवातील मिरवणुका आणि विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानेही मंडळांच्या कार्यकर्त्यांना वेळेत मिरवणूक काढून नियोजित वेळेत विसर्जन पूर्ण करण्याचे आवाहन केले. वेळेचे नियोजन केल्यास विसर्जन प्रक्रिया अधिक सुरळीतपणे पार पाडता येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
शिबिराला उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, PSI भगवान कोळी, पोलीस सिद्धांत शिसोदे, लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, सचिव जयेश गुजराथी, डॉ. रविंद्र कॉलरा, मनीष जोशी, विनोद अग्रवाल, महेंद्र पाटील, जय बजरंग मंडळाचे अध्यक्ष सागर वाघ, नगरसेवक गोपी कासार, सूरज परदेशी, शैलेश पाटील, हरीश भावसार, हर्षल विसपुते, किरण भावसार, प्रसाद करंजे, आदित्य भावसार, बाळू जाधव यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य, मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक, पोलीस व होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.
‘सजग नागरिक, सुरक्षित समाज’ या संदेशातून झालेल्या या उपक्रमामुळे आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंत योग्य प्राथमिक उपचार करण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन मिळाले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दीपक वाल्हे यांनी केले.
![]()

