सानेनगरातील बोरी नदीकाठची घटना; वनविभागाकडून दोन पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावण्याची तयारी…
प्रतिनिधी|अमळनेर : सानेनगर परिसरातील बोरी नदीकाठाजवळ झुडपांमध्ये बसलेल्या योगेश मनोज पाटील या तरुणावर बिबट्याने झडप घालून त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. बिबट्याने योगेशच्या शर्टाला पकडल्याचे सांगण्यात येत असून, त्याने प्रसंगावधान राखत जोरजोरात मदतीसाठी आरोळ्या मारल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. या घटनेत योगेशचा जीव थोडक्यात बचावला असून, त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पाटील हा गुरे चारण्यासाठी गेलेल्या मित्रांना भेटण्यासाठी बोरी नदीकाठच्या परिसरात गेला होता. झुडपांजवळ तो बसलेला असताना अचानक त्याच्या मागून बिबट्या आल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर बिबट्याने त्याच्यावर झडप घालत पकडण्याचा प्रयत्न केला. बिबट्याने शर्ट पकडून त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केला. योगेशने पुढे ओढ घेत स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला.
या प्रसंगी योगेशने बिबट्यापासून बचाव करण्यासाठी प्रतिकार केला. त्याने बिबट्याला ठोसा मारून सुटण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यातून सुटका न झाल्याने त्याने मोठमोठ्याने ‘वाचवा, वाचवा’ अशी हाक दिली. त्याच्या आरडाओरड्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढल्याचे सांगण्यात आले. आवाज ऐकून परिसरातून जाणारा एक बैलगाडी चालक घटनास्थळी धावत आला. त्यानंतर नागरिकांचीही घटनास्थळी गर्दी झाली.
घटनेची माहिती मिळताच वनपाल गुलाब पिंजारी यांनी वनरक्षक योगेश पाटील, मनीषा मोरे यांच्यासह वनविभागाच्या पथकाला घटनास्थळी पाठवले. वनविभागाच्या पथकाने परिसराची पाहणी केली. दरम्यान, माजी नगरसेवक मुख्तार खाटीक यांच्यासह काही नागरिकांनी काठ्या घेऊन परिसरात बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
दोन पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे लावण्याची तयारी
बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाकडून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यासह दोन पिंजरे लावण्याची तयारी करण्यात येत आहे. वनाधिकारी छत्रपती चव्हाण यांच्या परवानगीने ही कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती वनपाल गुलाब पिंजारी यांनी दिली. त्यापैकी एका पिंजऱ्यात बिबट्याला आकर्षित करण्यासाठी लहान प्राणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
सानेनगर आणि बोरी नदीकाठच्या परिसरात बिबट्याच्या हालचालीची घटना समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नदीकाठ, झुडपी भाग तसेच गुरे चारण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
![]()

