नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांना उपस्थितीचे आवाहन…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेने नव्या मालमत्तांना आकारलेल्या घरपट्टीच्या संदर्भात १५ व १६ सप्टेंबर रोजी नगररचना विभागामार्फत सुनावणी घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर घरपट्टीबाबत पुढील भूमिका व कृतीची दिशा ठरविण्यासाठी रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज गार्डन, पोस्ट ऑफिसजवळ, अमळनेर येथे नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
निवृत्त वरिष्ठ लिपिक सोमचंद संदानशिव यांनी दिलेल्या आवाहनानुसार, नव्या मालमत्तांचे मोजमाप करताना कोअर प्रोजेक्ट कंपनी, अमरावतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मोजमापाबाबत नागरिकांकडून आक्षेप नोंदविण्यात येत आहेत. चुकीच्या पद्धतीने मोजमाप करून अवाजवी घरपट्टी आकारण्यात आल्याचा दावा आवाहनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित घरपट्टी कमी किंवा रद्द करण्यासाठी नागरिकांनी संघटितपणे पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे संदानशिव यांनी म्हटले आहे.
सुनावणीनंतर घरपट्टीच्या प्रश्नावर पुढील कायदेशीर, प्रशासकीय आणि लोकशाही मार्गांचा विचार करण्यासाठी बैठकीत चर्चा व विचारविनिमय करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपापल्या मालमत्तेशी संबंधित कर आकारणीची कागदपत्रे, मोजमाप व घरपट्टीबाबतची माहिती घेऊन बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीस अमळनेर नगरपरिषदेतील सत्ताधारी व विरोधी पक्षांचे नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच शहरातील संबंधित नागरिकांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, अशी विनंती सोमचंद संदानशिव यांनी केली आहे.
![]()

