१३ शाळांमधील १३० विद्यार्थ्यांचा सहभाग; विजेते खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार…
प्रतिनिधी | अमळनेर : नोबल पोदार लर्न स्कूल येथे शासकीय शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील १३ शाळांमधील सुमारे १३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वयोगट १४, १७ आणि १९ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील विजयी खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेत अमळनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नगरसेविका स्वप्ना पाटील, सामाजिक कार्यकर्त्या तिलोत्तमा पाटील आणि तालुका क्रीडा अध्यक्ष एस. पी. वाघ यांच्या हस्ते माँ सरस्वतीचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
उद्घाटनप्रसंगी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेहनत, परिश्रम आणि जिद्दीने प्रयत्न करून खेळाडूवृत्ती जोपासण्याचे आवाहन केले. क्रीडा क्षेत्रातून पुढे जात देशाचा मानसन्मान वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
स्पर्धेदरम्यान बुद्धिबळाच्या डावांमध्ये विद्यार्थ्यांनी कौशल्य आणि संयमाची चुणूक दाखवली. स्पर्धेचे पंच म्हणून अरुण प्रभाकर सपकाळे, शेख सर, कैलास बाविस्कर, जितेंद्र जेठवा, पोदार स्कूलचे क्रीडा शिक्षक अर्शद शेख, जयेश मासरे आणि प्रितेश तुरणकर यांनी जबाबदारी पार पाडली.
यावेळी वामन चव्हाण, भास्कर चौधरी, शाळेचे प्राचार्य रमण कुमार, प्रशासकीय अधिकारी योगेश पाटील यांच्यासह सहभागी शाळांचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेच्या चेअरमन डॉ. अर्चना प्रशांत सूर्यवंशी आणि प्रशांत भगवान सूर्यवंशी यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यात विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
![]()

