मे महिन्यात निवेदन देऊनही कार्यवाही नाही, जवळील फिडरवर स्थलांतरासह कायमस्वरूपी उपायाची मागणी…
प्रतिनिधी | अमळनेर : सबस्टेशनपासून अवघ्या सुमारे १० मीटर अंतरावर असलेल्या DTC क्र. 4232074 वरील ग्राहकांना गेल्या जवळपास दोन वर्षांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत असून, महावितरण प्रशासनाकडे निवेदन देऊनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
DTC क्र. 4232074 चा वीजपुरवठा सध्या साने नगर फिडरवरून करण्यात येतो. सदर फिडर सबस्टेशनपासून पुढे सुमारे ५ किलोमीटरपर्यंत मुख्यतः शेती क्षेत्रातून जात असल्याने या मार्गावर फॉल्ट झाल्यास तो शोधण्यासाठी व दुरुस्तीसाठी पेट्रोलिंग पथकाला मोठा वेळ लागतो. परिणामी, या डीटीसीवरील ग्राहकांचा वीजपुरवठा वारंवार दोन ते तीन तास खंडित होत असल्याची ग्राहकांची तक्रार आहे.
विशेष म्हणजे, याच परिसरातील इतर ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू असताना DTC क्र. 4232074 वरील ग्राहकांना मात्र वीजखंडिततेचा सामना करावा लागत असल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
या समस्येबाबत २७ मे २०२६ रोजीच महावितरणच्या अमळनेर शहर कक्ष-२ येथील सहाय्यक अभियंत्यांकडे लेखी निवेदन देण्यात आले होते. सदर डीटीसीचा पुरवठा जवळील उपलब्ध फिडरवर स्थानांतरित केल्यास ग्राहकांची वारंवार होणारी गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते. तसेच साने नगर फिडरवरील घरगुती डीटीसी आणि सबस्टेशनजवळील सदर डीटीसी यांच्यातील अंतर सुमारे ५ ते ५.५ किलोमीटर असल्याने पुरवठ्याची पुनर्रचना करणे तांत्रिकदृष्ट्याही अधिक व्यवहार्य ठरू शकते, अशी मागणी करण्यात आली होती.
मात्र, निवेदन देऊन अनेक महिने उलटूनही अपेक्षित उपाययोजना न झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी वाढत आहे. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या कालावधीतही या डीटीसीवरील वीजपुरवठा तब्बल तीन तास खंडित राहिला. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामकाजात मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.
“सबस्टेशनच्या अगदी जवळ डीटीसी असूनही केवळ फिडर जोडणीमुळे आम्हाला वारंवार तासन्तास वीजखंडिततेचा सामना करावा लागत आहे. शेजारील परिसरात वीजपुरवठा सुरू असताना आमचाच परिसर अंधारात राहतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याऐवजी वारंवार होणारी गैरसोय सहन करण्याची वेळ ग्राहकांवर येत आहे,” अशी भावना स्थानिक ग्राहकांनी व्यक्त केली.
महावितरण प्रशासनाने ग्राहकांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन DTC क्र. 4232074 च्या फिडर जोडणीचा तांत्रिक आढावा घेऊन शक्य असल्यास जवळील फिडरवर पुरवठा स्थानांतरित करावा, तसेच तोपर्यंत वारंवार होणाऱ्या वीजखंडिततेवर तात्पुरत्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
समस्या तातडीने सोडविण्यात न आल्यास ग्राहकांना लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
![]()

