महावितरणच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक; वीजप्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आमदारांचे निर्देश…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा सुरळीत आणि पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे बळकटीकरण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी तालुक्यातील सहा ३३ केव्ही उपकेंद्रांवर प्रत्येकी ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर (PTF) बसविण्यात येणार असून, शिरूड येथे नवीन ३३ केव्ही उपकेंद्राचे कामही सुरू आहे. ही कामे नोव्हेंबर २०२६ अखेर पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अनिल पाटील यांनी दिले आहेत.
कृषी पंपांना दिवसा पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करताना निर्माण होणारा भार, उपकेंद्रांची क्षमता आणि कृषी वाहिन्यांवरील ओव्हरलोड यासंदर्भात गुरुवारी, ११ सप्टेंबर रोजी आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत अमळनेर तालुक्यातील वीज वितरण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
तालुक्यात सध्या १४ ठिकाणी ३३ केव्ही क्षमतेची उपकेंद्रे कार्यरत आहेत. वाढती वीज मागणी आणि कृषी क्षेत्रावरील वाढता भार लक्षात घेता केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता वीज वितरण यंत्रणेची क्षमता वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
याअंतर्गत ३३ केव्ही वावडे, अंतुर्ली, जानवे, कळमसरे, सरबेटे आणि भरावस या सहा उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. संबंधित कामे सुरू असून ती युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अतिरिक्त रोहित्रांमुळे संबंधित उपकेंद्रांवरील भाराचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार असून, कृषी वाहिन्यांवरील वीजपुरवठा सुरळीत करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. तालुक्याच्या वीज वितरण व्यवस्थेवरील वाढता भार लक्षात घेऊन शिरूड येथे नवीन ३३ केव्ही उपकेंद्रास मंजुरी देण्यात आली आहे. या उपकेंद्राचे काम सध्या सुरू आहे.
नवीन उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर परिसरातील वीज वितरणाचा भार विभागला जाणार असून, त्यामुळे वीजपुरवठ्याची विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल. भविष्यातील कृषीबरोबरच घरगुती आणि व्यावसायिक वीज मागणी हाताळण्यासाठीही या उपकेंद्राचा उपयोग होणार आहे.
तालुक्यातील जानवे, सरबेटे, कळमसरे आणि गांधली या चार उपकेंद्रांतून निघणाऱ्या कृषी वाहिन्यांवर ओव्हरलोडची समस्या निर्माण होत असल्याने दिवसा कृषी पंपांना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करणे अनेकदा आव्हानात्मक ठरत होते. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवून वीज वहन क्षमता वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कृषी वाहिन्यांवरील भाराचे योग्य विभाजन करून वीजपुरवठा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे.
आढावा बैठकीत आमदार अनिल पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. संबंधित कामे केवळ मंजुरीपुरती न राहता विहित मुदतीत प्रत्यक्ष पूर्ण झाली पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला. सर्व कामे नोव्हेंबर २०२६ अखेर पूर्ण करण्याचे कडक निर्देश संबंधित अधिकारी व अभियंत्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे नोव्हेंबरनंतर अमळनेर तालुक्यातील कृषी पंपांना दिवसा अधिक सक्षम आणि विनाअडथळा वीजपुरवठा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता निलेश सोनगिरे (धरणगाव विभाग), अतिरिक्त कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर अंबाडकर (अमळनेर शहर उपविभाग), उपकार्यकारी अभियंता मनोज भावसार (अमळनेर ग्रामीण उपविभाग), सहाय्यक अभियंता अविनाश सूर्यवंशी (पायाभूत आराखडा, धरणगाव) तसेच सहाय्यक अभियंते चैतन्य वाघ, विनायक बोरसे आणि अमित चव्हाण उपस्थित होते.
वीज वितरण यंत्रणेच्या या प्रस्तावित आणि सुरू असलेल्या कामांमुळे तालुक्यातील कृषी वीजपुरवठ्याची क्षमता वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आता मंजूर कामे प्रत्यक्षात किती वेगाने पूर्ण होतात आणि त्याचा शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्यावर किती परिणाम होतो, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
![]()

