कोअर प्रोजेक्ट, अमरावतीमार्फत झालेल्या कर आकारणीची फेरमोजणी करण्याची मागणी; १५ व १६ रोजी सुनावणी…
प्रतिनिधी | अमळनेर : नवीन मालमत्तांवर काही वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या मालमत्ता कर आकारणीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर अमळनेरकरांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सामूहिकरीत्या भूमिका मांडावी, असे आवाहन अमळनेर नगरपरिषदेचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक सोमचंद संदानशिव यांनी केले आहे. दि. १५ व १६ सप्टेंबर रोजी संबंधित प्रकरणांची सुनावणी सुरू असल्याने नागरिकांनी आपली बाजू मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सुमारे दोन ते अडीच वर्षांपूर्वी नवीन मालमत्तांवर कर आकारणी करण्याचे काम कोअर प्रोजेक्ट, अमरावती या संस्थेला निविदेच्या माध्यमातून देण्यात आल्याचे सोमचंद संदानशिव यांनी म्हटले आहे. या कामासाठी सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांच्या निविदेचा संदर्भ देत त्यांनी सदर कर आकारणीच्या प्रक्रियेची फेरतपासणी करण्याची गरज व्यक्त केली आहे.
वास्तविक सदरचे कर लावताना कोअर प्रोजेक्ट च्या खाजगी इसमानी लावले आहेत. आणि जे कर लावलेले आहेत त्यांना जिझिया कर म्हणावे की, तुघलक कर याबद्दल देखील शंका वाटते. कारण सदरचे कर महानगरपालिका हद्दीत देखील लावलेले नसावेत. उपलब्ध माहितीनुसार सदरच्या सुनावणीत २/३% टक्केच सवलत दिली जाऊ शकते. त्यामुळे जर नागरिकांनी वेळीच या विषयी आवाज उठवला नाही तर नागरीकांना पश्चाताप करण्यावाचून पर्यायच राहणार नाही अशी ठाम भूमिका सोमचंद संदानशिव यांनी मांडली आहे.
दरम्यान, शहरातील काही कॉलनी भागांमध्ये मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न अद्याप कायम असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. काही भागांत रस्ते तसेच गटारींच्या सुविधांचा अभाव असताना त्या भागातील मालमत्तांवर आकारण्यात येणाऱ्या कराबाबत नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर कोअर प्रोजेक्ट, अमरावती यांना देण्यात आलेले काम रद्द करून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत नव्याने मालमत्ता मोजणी व कर आकारणी करण्यात यावी, अशी मागणी सोमचंद संदानशिव यांनी केली आहे. यासाठी नागरिकांची समिती स्थापन करून कर आकारणीच्या प्रक्रियेचा पुनर्विचार करण्यासाठी सामूहिक आंदोलन उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
कारण कोअर प्रोजेक्ट कंपनी ला दिलेले पैसे नागरिकांच्या कर आकारणी निधी कापला लागणार आहेत. कर आकारणीच्या कामासाठी करण्यात आलेला खर्च अखेरीस नगरपरिषदेच्या माध्यमातून नागरिकांच्या निधीतूनच भागविला जाणार असल्याने या संपूर्ण प्रक्रियेबाबत नागरिकांनी आपली भूमिका निश्चित मांडावी, असे जाहीर आवाहन सोमचंद संदानशिव यांनी केले आहे.
![]()

