अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकांबाबत प्रशासनाची स्पष्ट भूमिका; एक मंडळ–एक अंमलदार नियोजनासह सीसीटीव्ही व ड्रोनची नजर…
प्रतिनिधी | अमळनेर : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत शासनाच्या नियमावलीनुसार विसर्जन मिरवणुकांच्या वेळेबाबत चर्चा झाली असून, निर्धारित वेळेनंतर मिरवणुका थांबविण्याची प्रशासनाची स्पष्ट भूमिका असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेषतः रात्री १२ वाजेपर्यंतची परवानगी असलेल्या दिवशी रात्री १२ नंतर कोणत्याही गणेश मंडळाच्या मिरवणुकीला परवानगी राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
पीएसआय दत्तात्रय निकम यांनी बैठकीत प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, रात्री १२ वाजता एखाद्या गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक अद्याप मंडळाच्या ठिकाणीच असली, तरी निर्धारित वेळेनंतर ती तेथेच थांबविण्यात येईल. त्यामुळे मंडळांनी वेळेचे नियोजन करून विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांनी सांगितले की, पोलिस प्रशासन, अमळनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला नगरसेवकांची उपस्थिती होती. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळेबाबत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या नियमावलीवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
विसर्जनाच्या दिवसानुसार शासनाने दिलेल्या परवानगीनुसार रात्री १० किंवा १२ वाजेपर्यंत वाद्ये वाजविण्याची मुभा राहणार आहे. त्यानंतर मिरवणूक थांबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी गणेश मंडळे, नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी एक आरसीपी, २० रिक्रूट जवान/कर्मचारी, बाहेरील पोलिस ठाण्यांमधील दोन पीएसआय दर्जाचे अधिकारी आणि एक पोलिस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी उपलब्ध करण्यात आला आहे. पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार ‘एक मंडळ–एक अंमलदार’ या पद्धतीने नियोजन करण्यात आल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे प्रत्येक गणेश मंडळाच्या मिरवणुकीवर पोलिस यंत्रणेचे लक्ष राहणार आहे.
अमळनेर नगरपरिषदेने मिरवणूक मार्गावर यापूर्वी बसविण्यात आलेले ८-९ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा कार्यान्वित केले आहेत. आवश्यकता भासल्यास मिरवणूक मार्गावर अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासोबतच ड्रोन कॅमेऱ्याद्वारेही मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. मिरवणुकीत हानिकारक गुलालाचा वापर करू नये, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार यापूर्वी विविध स्तरांवर दारूबंदीची कारवाई करण्यात आली असून, पुढेही ही कारवाई सुरू राहणार असल्याचे एसडीपीओ विनायक कोते यांनी सांगितले.
नगराध्यक्ष बाविस्कर यांनी सांगितले की, अमळनेर तालुक्यात मागील दोन-तीन वर्षांत प्रथमच अशा स्वरूपाची संयुक्त बैठक होत आहे. पोलिस प्रशासनाच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली. नगरपरिषदेच्या वतीने शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली असून, गणेश मंडळांना आवश्यक प्रकाशव्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गणेशोत्सव आनंद, उत्साह आणि शांततेत पार पाडावा तसेच शासनाने निर्धारित केलेल्या नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.
![]()

