चालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल; मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई…
प्रतिनिधी | अमळनेर : मंगल मंदिराच्या मागील बाजूस सुरू असलेल्या कथित अवैध मुरुम उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाच्या डंपर थांबविण्याच्या इशाऱ्याकडे साफ दुर्लक्ष करून चालकाने डंपर भरधाव वेगाने पळवून नेल्याची खळबळजनक घटना गत १३ रोजी दुपारच्या सुमारास घडली. या संपूर्ण प्रकाराने महसूल यंत्रणेच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मंडळ अधिकारी नरेंद्रकुमार धनराळे यांनी पोलिसांकडे सविस्तर फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना मंगल मंदिराच्या मागील बाजूस अवैध पद्धतीने मुरुम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली होती. ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेला कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार मंडळ अधिकारी धनराळे हे ग्राममहसूल अधिकारी आदिती जरे यांच्यासह संपूर्ण पथक घेऊन घटनास्थळाकडे कारवाईसाठी रवाना झाले होते.
पथक घटनास्थळाकडे जात असतानाच समोरून मुरुम वाहतूक करणारा डंपर क्रमांक एमएच १४ सीपी ६२७५ येताना त्यांना दिसला. संशय बळावल्याने महसूल पथकाने तात्काळ डंपर थांबविण्याचा इशारा केला. मात्र चालकाने पथकाच्या या इशाऱ्याकडे साफ दुर्लक्ष करत डंपर क्षणभरही न थांबवता भरधाव वेगाने पुढे दामटला. यामुळे पथकातील अधिकाऱ्यांनी तात्काळ डंपरचा पाठलाग सुरू केला.
पाठलाग सुरू असतानाच अमळनेर बसस्थानकाच्या अलीकडे चालकाने डंपर अचानक डाव्या बाजूस वळवून नेला. पथकाने पाठलाग सोडला नाही. त्यानंतर इस्लामपुरा परिसरातील दुर्गा हॉस्पिटलजवळ महसूल अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा डंपर अडविण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र यावेळीही चालकाने डंपर न थांबवता तो पुढे नेला. या दरम्यान महसूल अधिकाऱ्यांनी चालकाला थांबण्याबाबत समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्याचाही काहीही उपयोग झाला नाही. रस्त्यावरील वाहतुकीच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या परिस्थितीकडे साफ दुर्लक्ष करून चालकाने भरधाव वेगाने डंपर पळवून नेल्याचे फिर्यादीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणी डंपरचालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८८ अन्वये अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोहेकॉ मिलिंद सोनार करीत आहेत.
दरम्यान, अवैध उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकासमोरच डंपर न थांबवता तो पळवून नेण्याच्या या प्रकारामुळे महसूल विभागाच्या कारवाईला किती गांभीर्याने घेतले जाते, तसेच अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाडस किती वाढले आहे, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
![]()

