घुंग्या नाला भागात वासरू व गोऱ्ह्यावर हल्ल्याची घटना; वन विभागाकडून पंचनामा, कॅमेरा ट्रॅप लावण्याची तयारी…
प्रतिनिधी | अमळनेर : तालुक्यातील अंतुर्ली–रंजाणे परिसरातील नंदगाव शिवारालगत घुंग्या नाला भागात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. १४ सप्टेंबर रोजी सकाळी परिसरात वासरू आणि गोऱ्ह्यावर हल्ला झाल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी आढळलेल्या पंजाच्या खुणांची पाहणी केल्यानंतर वन विभागाने प्राथमिक तपासणी करत पंचनामा केला आहे. बिबट्याच्या वावराची खात्री करण्यासाठी परिसरात गस्त वाढवून आवश्यकतेनुसार कॅमेरा ट्रॅप बसविण्याची तयारी वन विभागाने सुरू केली आहे.
घुंग्या नाला परिसरात सकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास वासरू आणि गोऱ्ह्यावर हल्ला झाल्याचे आढळून आले. सकाळी सातच्या सुमारास शेतकरी उमेश पाराधी हे गोऱ्ह्यांना चारा-पाणी देण्यासाठी गेले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली.
माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. परिसराची पाहणी करून हल्ल्याच्या घटनेचा पंचनामा करण्यात आला. घटनास्थळी आढळलेल्या पंजांच्या खुणांचा आधार घेत या भागात बिबट्याचा वावर असण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, १० सप्टेंबर रोजी पोळ्याच्या दिवशी याच परिसरात बिबट्या दिसल्याचे काही नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर आता जनावरांवरील हल्ल्याची घटना समोर आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे.
घुंग्या नाला परिसरासह लगतच्या भागात वन विभागाकडून पुन्हा गस्त घालण्यात येणार आहे. बिबट्याच्या वावराच्या अधिक खुणा आढळल्यास कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. बिबट्या एका ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य करत नसल्याने नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, तसेच बिबट्या किंवा त्याच्या वावराच्या खुणा आढळल्यास तातडीने वन विभागाला कळवावे, असे आवाहन वन अधिकारी गुलाब पिंजारी यांनी केले. पाहणी व पंचनाम्यावेळी मनीषा मोरे आणि योगेश पाटील उपस्थित होते.
![]()

