महावितरणच्या SDO कार्यालयात १७ सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा; नवीन मीटरनंतर वाढीव बिलांचा, सोलर बिलिंग व मीटरसक्तीबाबतचा मुद्दा ऐरणीवर…
प्रतिनिधी | अमळनेर : शहर व परिसरातील नवीन वीजमीटरनंतर अवाजवी वीजबिले येत असल्याच्या तक्रारींची चौकशी करून ग्राहकांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी १७ सप्टेंबर २०२६ पासून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयाच्या आवारात हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.
मा. आमदार शिरीषदादा चौधरी तसेच शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरसेवक गुलाब बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रविण पुरुषोत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
निवेदनात नवीन वीजमीटर बसवल्यानंतर कमी वीजवापर असतानाही मोठ्या रकमेची बिले प्राप्त होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासाठी वीजबिलांची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. एका पंख्याचा वापर असलेल्या दुकानाला २१ हजार रुपयांचे वीजबिल आल्याचे उदाहरणही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सौरऊर्जा प्रकल्प बसवलेल्या ग्राहकांच्या मीटर रीडिंग तसेच वीजेच्या आयात-निर्यात नोंदींबाबतही तक्रारी मांडण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत होत असलेल्या त्रुटींची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय ग्राहकांवर नवीन वीजमीटर बसविण्यासाठी केली जाणारी सक्ती थांबवावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनाची दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांना संबंधित तक्रारींची तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे निवेदनकर्त्यांकडून सांगण्यात आले.
निवेदन सादर करताना युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रविण पुरुषोत्तम पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख पंकज संतोष शेटे, युवासेना तालुका प्रमुख राहुल कंजर, उपशहर प्रमुख अमन जाकीर खाटिक, उपशहर संघटक मोहित नितिन पाटील, शहर संघटक पंकज अरुण चौधरी, उपतालुका प्रमुख जयेश रविंद्र चव्हाण, भूषण गोपिचंद कोळी, गणेश रमेश जाधव, खंडू सोमाजी कोळी, विजय महाजन, जयेश ठाकरे, अथर्व डेरे, किरण बडगुजर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अंधा पाटील, दिनेश ज्ञानेश्वर पाटील, राहुल साहेबराव पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महावितरणकडून करण्यात येणाऱ्या चौकशीचा अहवाल आणि त्यानंतरची कार्यवाही यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे निवेदनकर्त्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
![]()

