पाच पावली मंदिरासमोरील ठिकाणी विक्रेते व नागरिकांची गैरसोय…
प्रतिनिधी | अमळनेर : अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अमळनेर शहरात कालपासून जोरदार हजेरी लावल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती विक्रीसाठी दुकाने थाटलेल्या विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे गणेशमूर्तींचे नुकसान होण्याबरोबरच विक्रेत्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मूर्ती विक्रीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याने नागरिकांनाही ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील पाच पावली मंदिरासमोरील नगरपालिकेच्या शाळेच्या परिसरात गणेशमूर्ती विक्रीसाठी दुकाने लावण्यात आली आहेत. या जागेसाठी विक्रेत्यांकडून सुमारे ५०० रुपये शुल्क आकारले जात असल्याची माहिती आहे. जागेच्या वापरासाठी शुल्क वसूल केले जात असताना विक्रेते आणि नागरिकांसाठी पावसापासून संरक्षण, सुरक्षित ये-जा तसेच परिसरातील आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपालिकेची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी सुविधांचा अभाव दिसून येत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पावसामुळे परिसरात चिखल साचल्याने गणेशमूर्ती घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसह विक्रेत्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः मूर्तींचे नुकसान होऊ नये यासाठी विक्रेत्यांना अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागत असून, अचानक आलेल्या पावसामुळे आधीच मर्यादित असलेल्या व्यवसायावर आर्थिक परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गणेशमूर्ती विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देताना शुल्क आकारले जाते; मात्र त्याच ठिकाणी विक्रेते आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. शुल्क वसुली आणि आश्वासनांनंतर सुविधा देण्याची वेळ आली की नगरपालिका नेमकी कुठे गायब होते? असा संतप्त सवाल नागरिक व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास गणेशमूर्ती विक्रेत्यांचे आणखी नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने संबंधित परिसरातील चिखल आणि पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी, विक्रेत्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
![]()

