१७ सप्टेंबरपासून विविध क्रीडा प्रकारांच्या तालुकास्तरीय स्पर्धा; शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन नोंदणी पूर्ण करून संघ सज्ज ठेवण्याचे आवाहन…
प्रतिनिधी | अमळनेर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि अमळनेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२७ मधील शालेय शासकीय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना अमळनेर तालुक्यात सुरुवात होत आहे. विविध वयोगटांतील मुला-मुलींसाठी बुद्धिबळ, बॅडमिंटन, कुस्ती, फुटबॉल, हॉलीबॉल, कॅरम, कबड्डी, खो-खो, क्रिकेट तसेच मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धांची सुरुवात १७ सप्टेंबर रोजी बुद्धिबळ स्पर्धेने होणार असून, सर्व गटांतील मुलांची स्पर्धा नोबल पोतदार स्कूल येथे होईल. १८ सप्टेंबरला मुलींची बुद्धिबळ स्पर्धा याच ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर १८ सप्टेंबरला मुलांची आणि १९ सप्टेंबरला मुलींची बॅडमिंटन स्पर्धा प्रताप कॉलेज हॉल येथे होणार आहे.
२१ सप्टेंबरला कुस्ती स्पर्धा तालुका क्रीडा संकुल येथे होणार आहे. त्यानंतर २३ सप्टेंबरला मुलांची आणि २४ सप्टेंबरला मुलींची फुटबॉल स्पर्धा प्रताप कॉलेज येथे आयोजित करण्यात आली आहे. २६ सप्टेंबरला मुलांची आणि २७ सप्टेंबरला मुलींची हॉलीबॉल स्पर्धा जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय येथे होणार आहे.
ऑक्टोबर महिन्यातही विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा सुरू राहणार आहेत. ३ ऑक्टोबरला मुलांची आणि ५ ऑक्टोबरला मुलींची कॅरम स्पर्धा अॅड. ललिता पाटील इंग्लिश स्कूल येथे होईल. ७ ऑक्टोबरला मुलांची आणि ८ ऑक्टोबरला मुलींची कबड्डी स्पर्धा सायर देवी स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. १० ऑक्टोबरला मुलांची आणि १२ ऑक्टोबरला मुलींची खो-खो स्पर्धा आ. मा. पाटील आश्रमशाळा, रणाईचे येथे होणार आहे.
१३ ऑक्टोबरला मुलांची आणि १४ ऑक्टोबरला मुलींची क्रिकेट स्पर्धा प्रताप कॉलेज येथे होईल. स्पर्धांच्या अंतिम टप्प्यात १६ ऑक्टोबरला मुलांची आणि १७ ऑक्टोबरला मुलींची मैदानी स्पर्धा तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे.
तालुक्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी संबंधित स्पर्धांसाठी ऑनलाइन नोंदणी व ऑनलाइन शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून प्रवेशिका काढाव्यात. तसेच सहभागी संघ व खेळाडू आवश्यक तयारीसह स्पर्धेसाठी सज्ज ठेवावेत, असे कळविण्यात आले आहे.
अमळनेर तालुका क्रीडा समितीचे क्रीडा अधिकारी जगदिश चौधरी, एस. पी. वाघ आणि संजय पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
![]()

