शेतकरी संघटनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन; गाय-वासरावर हल्ल्यानंतर संरक्षणाची मागणी जोर धरू लागली…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर तालुक्यातील नंदगाव, आंबारी रंजाणे, आंबारी व खापरखेडा शिवार परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेने उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांना निवेदन सादर करून तातडीने संरक्षणात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला अमळनेर तालुक्यातील उमेश पवार यांच्या गाय व वासरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. नंदगाव, आंबारी रंजाणे, आंबारी व खापरखेडा घुबड्या नाला रंजाणे या गावांच्या शिवारात सध्या भटक्या बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर व प्रादुर्भाव वाढल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकरी दिवसरात्र शेतात काम करत असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचबरोबर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित वन विभाग, महसूल विभाग, वन विभाग व कृषी विभागाने तातडीने या परिसराची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या –
निवेदनाद्वारे प्रशासनाकडे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत —
1. नंदगाव, आंबारी रंजाणे, आंबारी व खापरखेडा शिवारांची तातडीने पाहणी व पंचनामा करण्यात यावा.
2. बिबट्याचा प्रादुर्भाव व वावर रोखण्यासाठी संबंधित विभागामार्फत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
3. शेतकऱ्यांना बिबट्यापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन व आवश्यक सुरक्षा साधने-उपाय उपलब्ध करून द्यावेत.
4. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास सर्व्हे करून योग्य ती नुकसानभरपाई तातडीने द्यावी.
5. या परिसराशी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नियमित गस्त व देखरेख ठेवावी.
6. शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने ठोस व तातडीची कार्यवाही करावी.
निवेदनाच्या शेवटी, शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत, या निवेदनाची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे. हे निवेदन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकरी, जळगाव जिल्हा अध्यक्ष शरद बिलाराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पदाधिकारी व सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांसह उपविभागीय अधिकारी कार्यालय, अमळनेर येथे सादर करण्यात आले.
![]()

