अमळनेर नगरपरिषदेची जाहीर सूचना; या साहित्याच्या नावाखाली पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन…
अमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर शहरातील अमरधाम येथे अंत्यविधीसाठी आवश्यक असलेले गोकाष्ठ (गौरी), कापूर आणि तूप नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत अमळनेर नगरपरिषदेने जाहीर सूचना प्रसिद्ध केली असून, या साहित्याच्या बदल्यात कोणत्याही प्रकारची रक्कम मागितल्यास तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या हद्दीतील अमरधाम येथे अंत्यविधीसाठी आवश्यकतेनुसार या साहित्याचा पुरवठा नगरपरिषदेने नियुक्त केलेल्या जय मल्हार गोसेवा फाऊंडेशनमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या आप्तस्वकीयांनी गोकाष्ठ, कापूर किंवा तुपासाठी स्वतंत्रपणे पैसे देऊ नयेत, असे नगरपरिषदेच्या सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
या मोफत साहित्याच्या नावाखाली पैशांची मागणी झाल्यास नागरिकांनी संबंधित संपर्क क्रमांकावर तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारीनंतरही समाधानकारक कार्यवाही न झाल्यास नगरपरिषदेच्या स्वच्छता निरीक्षकांकडे लेखी तक्रार करण्याची सूचना देण्यात आली आहे.
दरम्यान, गोकाष्ठ, कापूर आणि तुपाव्यतिरिक्त रांगोळी, फुलांची सजावट किंवा अन्य अतिरिक्त सुविधा नागरिकांना आवश्यक असल्यास त्यासाठीचे शुल्क संबंधित नागरिकांच्या इच्छेनुसार व जबाबदारीवर पुरवठादारास द्यावे लागेल. या अतिरिक्त सुविधांचा नगरपरिषदेशी कोणताही संबंध राहणार नसल्याचे जाहीर सूचनेत नमूद करण्यात आले आहे.
मोफत उपलब्ध असलेल्या साहित्याच्या संदर्भात आर्थिक व्यवहार होऊ नये, यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. अंत्यविधीच्या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांवर अनावश्यक आर्थिक भार पडू नये, या दृष्टीने या सूचनेची माहिती नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. ही जाहीर सूचना अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आली आहे.
![]()

