पत्रकार संघ व तेरापंथ युवक परिषदेचा संयुक्त उपक्रम; तेरापंथ भवन आणि प्रताप कॉलेज येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजन…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ आणि अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आज, १७ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या प्रेरणेने आयोजित या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रोत्साहनपर आकर्षक ट्रॉली बॅग भेट देण्यात येणार आहे.
हे रक्तदान शिबिर अमळनेर शहरातील तेरापंथ भवन, न्यू प्लॉट तसेच प्रताप कॉलेज व इच्छादेवी चौक परिसर अशा दोन ठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. नागरिकांना आपल्या सोयीच्या ठिकाणी सहभागी होऊन रक्तदान करता येणार आहे.
‘रक्तदान… जीवनदान… आपका एक कदम, किसी के लिए नई उम्मीद…’ तसेच ‘थेंब तुमचा, जीवन त्यांचे—रक्तदान ही सर्वोत्तम सेवा’ या संदेशातून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. सुरक्षित रक्तदान, निरोगी समाज आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास हातभार लावणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रोत्साहन म्हणून ट्रॉली बॅग भेट दिली जाणार असल्याने नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘एक छोटी कृती, मोठा फरक’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या माध्यमातून रक्तदानाबाबत जनजागृती करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
या उपक्रमासाठी रोटरी क्लब अमळनेर, रोट्रॅक्ट क्लब अमळनेर, लायन्स क्लब अमळनेर, न्यू प्लॉट परिसर विकास मंच, जैन सोशल ग्रुप आणि जय बजरंग व्यायामशाळा, अमळनेर यांचे सहकार्य लाभत आहे. अमळनेर शहर व तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक व सहयोगी संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
![]()

