रक्षा बंधनानिमित्त देशसेवा व राष्ट्रकल्याणाच्या भावनेतून पाठवले रक्षा सूत्र; पंतप्रधानांनी मुलींच्या योगदानाचा केला गौरव…
प्रतिनिधी | अमळनेर : रक्षा बंधनानिमित्त अमळनेरचे नगराध्यक्ष तथा हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परीक्षित बाविस्कर यांची कन्या कु. अरुश्री परीक्षित बाविस्कर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी व शुभेच्छापत्र पाठवले होते. पंतप्रधान कार्यालयाला हे रक्षा सूत्र प्राप्त झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी अरुश्रीला विशेष पत्र पाठवून तिचे कौतुक केले असून, तिच्या भावनेबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
अरुश्री ही रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत आहे. देशातील नागरिकांचे आणि बालकांचे रक्षण, राष्ट्रकल्याण तसेच पंतप्रधानांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, या भावनेतून तिने रक्षा बंधनाच्या पर्वावर पंतप्रधानांना राखी पाठवली. तिच्या या उपक्रमातून राष्ट्रीय भावना आणि सामाजिक बांधिलकी व्यक्त झाल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रातून अरुश्रीच्या भावनेचे कौतुक करताना देशातील मुली व विद्यार्थिनी विविध क्षेत्रांत योगदान देत असल्याचे नमूद केले. क्रीडा, कौशल्य, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांत मुली आपली क्षमता सिद्ध करत असून राष्ट्रकल्याणासाठी स्वयंस्फूर्तीने योगदान देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
विकसित भारताच्या निर्मितीच्या प्रक्रियेत विविध क्षेत्रांतील शक्तींना नव्या ऊर्जेशी जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही पंतप्रधानांनी पत्रात नमूद केले आहे. उत्पादन, कृषी, तंत्रज्ञान, नवे विचार, गतिशक्ती, रक्षण, ग्रीन-ब्ल्यू उत्पादन तसेच सांस्कृतिक शक्ती या क्षेत्रांचा त्यांनी उल्लेख केला आहे.
अरुश्रीने आपल्या प्रयत्नांतून आणि योगदानातून बदलत्या भारताच्या प्रवासात सहभागी व्हावे, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी तिच्या उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांकडून आलेल्या या पत्रामुळे अरुश्री व तिच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे.
अरुश्रीचे वडील डॉ. परीक्षित बाविस्कर आणि आई डॉ. स्वाती परीक्षित बाविस्कर हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. रक्षा बंधनाच्या निमित्ताने अरुश्रीने केलेल्या या उपक्रमाची अमळनेरमध्ये चर्चा होत असून, बालवयातच राष्ट्रकल्याणाची भावना व्यक्त करणाऱ्या तिच्या कृतीचे कौतुक केले जात आहे.
![]()

